नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये टी-20 ट्रायसीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी कोहली-धोनीसारख्या दिग्गजांना आराम देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारत इंग्लंडमध्ये जाणार आहे. हा दौरा म्हणजे 2019 साली इंग्लंडमध्येच होणाऱ्या वर्ल्ड कपची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलरसाठी अनुकूल असल्यामुळे भारताचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांनी फास्ट बॉलर्सचा बॅक-अप घ्यायला सुरुवात केली आहे. मर्यादित ओव्हरच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह भारताची प्रमुख अस्त्र असतील. पण श्रीलंका दौऱ्यामध्ये नव्या खेळाडूंना संधी देऊन त्यांची क्षमता तपासण्याची संधी आमच्याकडे आहे, असं भरत अरुण म्हणालेत.


भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराह हे आमचे सर्वोत्तम बॉलर्स आहेत. पण श्रीलंका दौऱ्यामध्ये मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट या फास्ट बॉलरचा समावेश करण्यात आला आहे. हे बॉलर्स श्रीलंकेमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करतील, असा विश्वास भरत अरुण यांनी व्यक्त केला आहे.


पुढच्या काळामध्ये भरपूर क्रिकेट कार्यक्रम आहे त्यामुळे खेळाडूंचा फिटनेस आणि दुखापतींसाठी आम्हाला तयार राहावं लागेल, अशी प्रतिक्रिया अरुण यांनी दिली.